सोलापूर : प्रतिनिधी
महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या प्रचलित दरात ४ टक्के व घरभाडे भत्त्यात २ टक्के वाढ त्याचबरोबर रोजंदारी सेवकांना दैनिक वेतनात २० रूपये वाढ तसेच उदरनिर्वाह भत्ता वाढवून १ हजार रुपये करण्याची घोषणा महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त महानगरपालिकेच्या इंद्रभुवन येथे महापालिका आयुक्तांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला, याप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त निखील मोरे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त विद्या पोळ, उपायुक्त मच्छिद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे सहायक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य लेखापाल जवळेकर, नगररचना उपसंचालक मनिष भिष्णूरकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महापालिकेच्या आयुक्तांच्या समवेत संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
त्यानंतर तंबाखू मुक्तीची शपथ व स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची शपथ घेण्यात आली. यावेळी आयुक्तांनी शहरातील महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत झालेल्या विकास कामांची माहिती दिली. तसेच डफरीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहात आजवर ३० हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे. याठिकाणी रात्रदिवस रुग्णांना कॉर्पोरेट हॉस्पिटलसारख्या आरोग्य सेवा विनामूल्य पुरविण्यात येत आहेत, असेही सांगितले.
महानगरपालिकेतील वर्ग १ ते ४ संवर्गातील प्रलंबित १५५ सेवकांच्या पदोन्नतीस मंजुरी दिली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेतील रिक्त ३२ संवर्गातील ३०२ पदांची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात नियोजित असून, त्यासाठी २३ हजार ४३० अर्ज प्राप्त झाले आहेत. लवकरच भरती पूर्ण होणार आहे.
सौर ऊर्जेचे नवे प्रकल्प स्थापित करण्यात येत आहेत. महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी व विविध योजनेतून २.७ मेगावॅटचे सोलार प्रकल्प सुरु असून, आजवर सुमारे ४ कोटी वीजबिल बचत झाली आहे. तसेच प्रतिमाह १८ ते २० लाख रुपयांची बचत होत आहे. महापालिकेच्या माय सोलापूर मोबाईल अॅप्लीकेशनवरुन विविध प्रकारच्या ३० ऑनलाईन सेवा नागरिकांना उपलब्ध करुन देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नगररचना विभागाचे सहायक संचालक संभाजी कांबळे, नगर अभियंता सारिका आकुलवार, मुख्य लेखा परीक्षक रूपाली कोळी, आयुक्त यांचे स्वीय सहायक राहुल कुलकर्णी, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड, विद्युत विभागाचे अभियंता राजेश परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक लक्ष्मीनारायण दोंतुल, मिळकत कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर, आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, अविनाश वाघमारे, उपअभियंता नीलकंठ मठपती, रामचंद्र पेंटर, कामगार व कल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे, नगरसचिव प्रवीण दंतकाळे आदींसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.