ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गोकुळ शुगरची ऊस गाळपात मोठी आघाडी : ५ लाखांचा आकडा केला पार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

वाढीव ऊस दरामुळे सध्या जिल्ह्यात चर्चेत असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरने आज घडीला यशस्वीरत्या ५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा आकडा पार केला आहे त्यामुळे कर्मचारी तसेच शेती विभागाच्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अधिकाधिक गाळप करून कारखान्याची वाटचाल उच्चांकी गाळपाकडे होणार असल्याचा मनोदय चेअरमन दत्ता शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

हे उद्दिष्ट पार करण्यासाठी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे आपले बळ भक्कम स्वरूपात उभे असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.यावर्षी गळीत हंगामात येणाऱ्या उसाला प्रति टन पहिला हप्ता २८०० रुपये जाहीर करण्यात आलेला आहे.पहिल्या पंधरवड्यापासून ते आज पर्यंत सर्व बीले वेळेवर देण्याचा प्रयत्न केला आहे.

पहिला हप्ता २८०० रुपये जाहीर केल्याने शेतकऱ्यांचा कल हा गोकुळ शुगरकडे वाढल्याचे शेती विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर कारखान्यावर मोठ्या प्रमाणात ऊस दाखल होत असून हजारो टन ऊस वेटिंगमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.सध्या ऊस मोठ्या प्रमाणात गोकुळ शुगरकडे उपलब्ध आहे परंतु टोळ्यांची थोडी फार कमतरता आहे.शेतकरी सारखे फोन करत आहेत त्यामुळे उपलब्ध टोळ्यानुसार शेतकऱ्यांचा ऊस उचलण्यात येत आहे शेतकऱ्यांनी काळजी करू नये, त्यांचा संपूर्ण ऊस गाळप केल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही.शेतकऱ्यांनी निश्चित रहावे,असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन विशाल शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे,एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर प्रदीप पवार,कार्तिक पाटील, अभिजीत गुंड, उमेश पवार यांच्यासह कारखान्यातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!