अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
पंढरपूर हे महाराष्ट्राचे हृदय असून या ठिकाणी प्रकट झालेला समतेचा विचार महाराष्ट्रसह देशभर प्रवाहित झाला आहे. पंढरपूर प्रमाणे अक्कलकोट देखील श्री स्वामी समर्थांचे तीर्थक्षेत्र हे समतेचे केंद्र आहे. पंढरपूर आणि अक्कलकोट ही दोन्ही केंद्रे भक्तीचे संगम असून पंढरीतील पांडुरंग हे भाविकांचे हृदय तर अक्कलकोटचे स्वामी हे भाविकांची आत्मा असल्याचे प्रतिपादन पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंदिर समितीच्यावतीने चेअरमन महेश इंगळे यांनी ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.पुढे बोलताना औसेकर महाराज यांनी वारकरी सांप्रदाय, दत्त सांप्रदाय, नाथ सांप्रदाय या सर्व हिंदू धर्मातील विविध आध्यात्माचे बिंदू आहेत.
या माध्यमातून वारकरी संप्रदायातील भाविकांचा पंढरपूरकडे कल असतो, तर दत्त सांप्रदायातील भाविकांचा अक्कलकोट येथील स्वामी दर्शनाकडे कल असतो. किंबहुना दोन्हीही देवांचे दर्शन घेऊन धन्यता भावते, त्यामुळे ही दोन्ही पवित्र तिर्थक्षेत्रे धर्म आणि मानवी जीवन संस्कार जडणघडणाची केंद्रे आहेत,असेही त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराचे व्यवस्थापन पाहून मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांचे आभार मानले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, पत्रकार मारुती बावडे, आबा महाराज,मोहन चव्हाण,मडीवाळप्पा बदोले, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, ऋषिकेश लोणारी, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, समर्थ घाटगे आदी उपस्थित होते.