ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जरांगे पाटील नवा पक्ष स्थापन करणार ? राज्यात जोरदार चर्चा

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी सरकार विरोधात लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. आता जरी सरकारचं दुर्लक्ष होणार असलं तरी, १० तारखेपासून लक्ष द्यावंच लागेल, असं जरांगे यांनी ठणकावून सांगितलं आहे. दुसरीकडे जरांगे पाटील नवा पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याबाबत विचारणा केली असता, जरांगेंनी थेट आपली भूमिका स्पष्ट केली. हे आमच्या डोक्यात पण नाही, आमचा कसला राजकीय अजेंडा देखील नाही, असं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं.

मराठा आरक्षण देण्याबाबत मनोज जरांगेंनी सरकारला थेट इशारा दिलाय. या प्रश्नाकडे राजकीय घडामोडींमुळे दुर्लक्ष होईल असं वाटत नाही. कारण हा सामाजिक लढा आहे. मराठ्यांमध्ये तेवढी ताकद आहे की ते आरक्षण खेचून आणू शकतील, असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला.

आता जरी सरकारचे दुर्लक्ष होत असले तरी, येत्या १० तारखेपासून त्यांना लक्ष द्यावेच लागणार आहे. आमरण उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. आरक्षणाबाबतचा कायदा पारित व्हावा हे महत्त्वाचे आहे. सरकार ज्या गोष्टी करणार नाही, त्या गोष्टी मराठ्यांच्या एकजुटीने झाल्या आहेत, असंही ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील नवा पक्ष स्थापन करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर जरांगे पाटील म्हणाले, हे आमच्या डोक्यात पण नाही. आमचा राजकीय अजेंडा देखील नाही. गोरगरीब मराठ्यांची पोरं मोठी झाली पाहिजेत हे आमचं ध्येय आहे. त्यापासून आम्ही हटणार नाही. सोशल मीडियावर काय येतंय, त्यावर लक्ष देऊ नका. आरक्षण कसे मिळेल याकडे लक्ष द्या, असं ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!