अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे अक्कलकोट ते बोरिवली ही नवी नॉन एसी स्लीपर शयनयान बस सेवा सुरू करण्यात आली आहे.यामुळे खास करून रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची व दर्शनाला येणाऱ्या भाविकांची चांगली सोय झाली असून महामंडळाच्या या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत केले आहे.गाडी सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
या गाडीचा शुभारंभ वाहतूक निरीक्षक पवन हनगल, योगेश कुलकर्णी, वाहतूक नियंत्रक मदन घाटगे,कार्यशाळा अधीक्षक संजय कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. पहिले चालक संजय सांगळे आणि वाहक वीरेंद्र पाटील यांना यावेळी शुभेच्छा देऊन महिला प्रवाशांच्या हस्ते या गाडीची पूजा करण्यात आली.ही गाडी तीस सीटर असून ती पूर्णपणे स्लीपर स्वरूपात असल्याचे आगार प्रमुख मदनीपाशा जुनेदि यांनी सांगितले. दररोज सायंकाळी पाच वाजता ती अक्कलकोटवरून सुटणार आहे आणि पहाटे साडे सहा वाजता ती बोरिवलीला पोहोचणार आहे. त्याशिवाय बोरविलीमधून ती गाडी पुन्हा संध्याकाळी सहा वाजता सुटून सकाळी साडेसहा वाजता ती अक्कलकोटला पोहोचणार आहे. याचा मार्ग सोलापूर, पुणे, लोणावळा, खोपोली, पनवेल, सायन असा निश्चित झाला असून या गाडीला एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या सुविधा आणि सवलती लागू आहेत,असेही त्यांनी सांगितले. अक्कलकोट डेपोमधून एक महिन्यापूर्वीच आलूर ते मुंबई या स्लीपर सीटर गाडीचा शुभारंभ नुकताच करण्यात आला होता.
या गाडीला मिळणारा प्रतिसाद पाहता शयनयान बस सुरू करावी,अशी मागणी अक्कलकोट शहर व तालुक्यातून होत होती. त्याचा विचार करून आगार प्रमुख जुनेदी यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून ही गाडी प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केली आहे. तरी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.खाजगी वाहतुकीच्या तुलनेत महामंडळ देखील प्रवाशांना तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला तर या सेवेमध्ये देखील आणखी भर टाकून नव्या मार्गावर देखील या बसेस सुरू करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.