मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक मोठ्या शहरात गेल्या काही महिन्यापासून अनेक आगीच्या घटना घडत असतांना नुकतेच मुंबईतील गोवंडी परिसरात भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 20 ते 25 झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या आहेत. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र सुदैवाने घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गोवंडी-शिवाजी नगर आणि आदर्श नगर परिसरात काही झोपडपट्ट्या आणि दुकाने असल्याची माहिती आहे. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केले. काही क्षणातच आगीने संपूर्ण झोपडपट्टीला विळखा घातला. आग लागताच काही स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यामध्ये यश न आल्याने अग्निशमन दलाच्या 7 ते 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
दरम्यान, अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आग लागताच काही काळ स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे घटनास्थळी मोठी खळबळ माजली होती.
या आगीत काही झोपडपट्ट्या जळून खाक झाल्याने स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीत संसार उपयोगी वस्तू डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले होते. गोवंडी-शिवाजी नग आणि आदर्श नगर हा झोपडपट्टी परिसर असून या भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते.