मुंबई : वृत्तसंस्था
कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवर भरोसा ठेवणे कठीण आहे. या आरक्षणाचा नेमका काय लाभ होणार, ते टिकेल का यासाठी वाट पाहावी लागेल,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणाचे विधेयक सभागृहात एकमताने मंजूर झाल्यानंतर यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठा समाजाचे अभिनंदन करत ठाकरे पुढे म्हणाले, सरकारच्या हेतूवर आता तरी संशय घेणार नाही, पण मराठा समाजातील अनेकांना यासाठी बलिदान द्यावे लागले. उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्यावर लाठीचार्ज व्हायला नको होता. यापूर्वी २०१८ साली आणि आता मराठा आरक्षणाचा मुद्दा आला तेव्हा एकमताने त्याला पाठिंबा दिला आहे. पूर्वीचे अनुभव लक्षात घेता टिकणारे आरक्षण मिळेल, अशी आशा बाळगतो.
शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिले आहे. किती जणांना नोकऱ्या मिळतात, हे बघावे लागेल. मराठा समाजातल्या किती जणांना आणि कुठे नोकऱ्या मिळणार हे सरकारने जाहीर करावे, असेही ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीत दुमत नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण टिकण्याची हमी सरकारने घेतली आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही हमी दिली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही हमी नाही ना, अशी शंका उपस्थित करणार नाही. मात्र मुख्यमंत्री कोण आहेत आणि कसे आहेत, त्यांचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. सध्या ज्या प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यावरून जनतेचा विश्वास मुख्यमंत्र्यांवर नाही असे दिसते, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.