नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित ‘एनडीए’ आघाडीच्या ४०० हून अधिक जागा निवडून आणत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा संकल्प करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत प्रत्येक बुथवर ३७० अधिक मते जोडत ४०० जागांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा कानमंत्र त्यांनी दिला.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-चंबळ खोऱ्यातील मुरैना, भिंड, गुना आणि ग्वाल्हेर या चार लोकसभा मतदारसंघांतील बुथ व्यवस्थापन समितीचे ४०० नेते आणि कार्यकर्त्यांना अमित शाह यांनी संबोधित केले. या वेळी ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १०० दिवसांचा अवकाश आहे. पण कार्यकत्यांनी आतापासूनच कामाला लागावे. यंदा भाजपप्रणित एनडीए आघाडीचे ४०० हून अधिक खासदार निवडून आणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आणण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा. प्रत्येक मत पक्षासाठी मोजले जाणार आहे. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत प्रत्येक बुथवर अतिरिक्त ३७० मते भाजपच्या पारड्यात जमा करावी.
यासोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाची १० टक्के मते वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अमित शाह यांनी केले. आगामी लोकसभा निवडणूक भारताला महाशक्ती बनवणे व जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणारी असल्याचे अमित शाह यांनी खजुराहो येथे बोलताना सांगितले. काँग्रेसने २००४ ते २०१४ दरम्यान १२ लाख कोटींचे घोटाळे केले. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे काँग्रेस आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.