मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारने अहोरात्र मेहनत घेतली. मात्र आता मनोज जरांगे-पाटील आरक्षणासंदर्भात वारंवार भूमिका बदलत आहेत. त्यांच्याकडून कुणीतरी हे सगळे वदवून घेत असून यामागे राजकीय वास मला येतो आहे. या संपूर्ण घडामोडींचा सखोल तपास केला जाईल. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा गय केली जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा राज्य सरकारने आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना दिला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथा आणि परंपरेनुसार राज्य विधिमंडळाचे पाच दिवसीय अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची भूमिका मांडली. विरोधकांच्या बहिष्कारावर यावेळी सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. सलाईनमधून मला विष देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप जरांगे-पाटील यांनी केला.
सोमवारी ‘सागर’ बंगल्यावर येण्यासाठी जरांगे-पाटील निघाले आहेत. सरकारची याबाबत भूमिका काय? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला.
दरम्यान, सुरुवातीपासून जरांगे-पाटलांची मराठा समाजासाठी प्रामाणिक भावना होती. सरकारही त्यामुळे त्यांच्याबरोबर होते. कधीही अहंकार न बाळगता भेटायला गेलो. परंतु आताची त्यांची भाषा बदलली आहे. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांबाबत खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. फडणवीसांबाबत त्यांना आरोप करण्यासाठी कुणी सांगितले आहे का? हे आता पाहायला हवे. प्रत्येकाने आपापल्या मर्यादेत राहून न्याय हक्कासाठी लढायला हवे. मात्र वादग्रस्त वक्तव्य करून समाजाला त्रास होईल, असे वागू नये.