जालना : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला असून हे कटकास्थान फडणवीसांचं आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जरांगेंच्या आरोपानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालन्यातील अंबड तालुक्यात मराठा आंदोलकांनी बस पेटवली आहे.
या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी अंबड तालुक्यातील वाढता तणाव पाहता संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
जिल्ह्याधिकाऱ्यांनी अंबड तालुक्यात संचाबंदी लागू करण्याचे आदेश काढले आहेत. या काळात दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यास ठाम असून सध्या ते भांबेरी गावात आहेत. त्या ठिकाणी मराठा आंदोलक जमा होत असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी मनोज जरांगेंच्या कट्टर समर्थकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शिवबा संघटनेचे श्रीराम कुरणकर असं ताब्यात घेण्यात आलेल्या जरांगेंच्या सहकाऱ्यांची नावे आहेत.