मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागलेली असतांना बुधवारी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आता १ मार्च पर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर कोकणातही विजांसह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातही ढगांच्या गडगडाटांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर अशा 5 जिल्ह्यात आजपासून 1 मार्चपर्यंत असे 3 दिवस गारपीटीचीही शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणीही गारपीट होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. तर मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात 2 दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा तसंच नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागात ढगाळ देखील अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मागील तीन-चार दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. अशात बुधवारी पुन्हा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान केले आहे.
दरम्यान, अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण, गेल्या दोन दिवसांत राज्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कापणीसाठी तयार झालेल्या उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला होता, मात्र नुकसान टाळता आलेले नाही. पावसाआधीच योग्य त्या उपायोजना करणं गरेजचे आहे.