ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल : ही निवडणूक शेवटची ठरेल

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी काळात लोकसभा निवडणूकीचे देशभर वारे वाहू लागले असतांना ठाकरे गटाने मुखपत्रातून भाजप खासदार अनंत हेगडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘2024 ची सार्वत्रिक निवडणूक ही शेवटची निवडणूक ठरेल, ही भीती भाजप खासदार अनंत हेगडे यांनी खरी ठरवली आहे. असे ठाकरे गटाने म्हंटले आहे. भाजप खासदार अनंत हेगडे यांनी ‘चारशे पार’चे मनसुबे उघड केले आहेत. भाजपचा ‘चारशे पार’चा नारा ही संविधानाच्या हत्येची तयारी आहे. भाजपला चारशे पारचे बहुमत यासाठी हवे आहे की, त्या पाशवी आकड्याच्या बळावर भाजपास देशाचे पवित्र संविधान बदलायचे आहे. हे वक्तव्य गंभीर आहे, असेही ठाकरे गटाने म्हंटले आहे.

”2024 ची सार्वत्रिक निवडणूक ही शेवटची निवडणूक ठरेल, ही भीती भाजप खासदार अनंत हेगडे यांनी खरी ठरवली आहे. देशाचे सध्याचे संविधान नष्ट करून मोदी युगात नवे संविधान लिहिले जावे, असे मोदींच्या अवतीभवतीचे खास लोक बोलत असतात. लोकशाहीचा गाभा, लोकशाहीचा आधार, लोकशाहीचा बुरुज, लोकशाहीची तटबंदी, लोकशाहीची ढाल-तलवार म्हणजेच भारताचे संविधान. त्या संविधानाचा खून करण्याची तयारी सुरू आहे व त्यासाठी 400 मारेकरी तयार केले जात आहेत. भाजपचा ‘चारशे पार’चा नारा ही संविधानाच्या हत्येची तयारी आहे”, असे ठाकरे गटाने म्हंटले आहे.

”भारतीय जनता पक्षाच्या मनात संविधान बदलायचे असेल तर त्यामागची प्रेरणा काय आहे? जगातील अनेक देशांत संविधान संपवून हुकूमशाही सुरू झाली. मुसोलिनी, हिटलर, रुमानियाचे राज्यकर्ते, युगांडाचा इदी अमिन, लिबियाचा गद्दाफी यांनी संविधान न मानता स्वतःची हुकूमशाही प्रस्थापित केली. रशियाचे तहहयात अध्यक्ष पुतीन यांनीही त्यांच्या देशाचे संविधान आपल्या मनाप्रमाणे बदलून घेतले. संविधानात बदल करून पुतीन यांनी स्वतःला आजन्म अध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा केला. म्हणजे रशियात निवडणुका वगैरे व्यवस्था मोडीत निघाली. पुतीन हाच कायदा व पुतीन हेच संविधान. भारताचे संविधान बदलून भाजपला पुतीन यांच्याप्रमाणे मोदी यांना भारताचे बादशहा म्हणून नेमणूक करायची आहे काय? ”, असा खोचक सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!