परभणी : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील जोरदार तयारीत असतांना आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
जरांगे पाटील म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्याशेजारी बसून उपोषण करावे. मग त्यांना कळेल उपोषण काय असते, हवा कुठून बाहेर जाते व कुठून श्वास घ्यावा लागतो, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी आपली व फडणवीस यांच्यात जुंपली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उगीचच मध्ये पडल्याची भावनाही व्यक्त केली.
मनोज जरांगे पाटील सध्या परभणीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी एकाच दिवशी 5 ठिकाणी संवाद बैठका घेतल्या. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. विशेषतः त्यांनी फडणवीस यांना आपल्यासोबत उपोषणाला बसण्याचे आव्हान दिले. ते म्हणाले की, माझे देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान आहे. त्यांनी हिंमत असेल तर 8 दिवस माझ्याशेजारी बसून उपोषण करावे. मग त्यांना कळेल उपोषण काय असते, हवा कुठून बाहेर जाते व कुठून श्वास घ्यावा लागतो. वजन कमी करायचे असेल तर या आणि माझ्यासोबत उपोषणाला बसा.
देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर आई-बहिणीविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप केला. त्यांना 2 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी लागलेली मुलगी आई-बहीण वाटली नाही का? त्यांनी त्यांना वाटेल ते करावे, मी आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आमच्या आया-बहिणींना आजही नीट चालता येत नाही. कारण, लाठीचार्जमध्ये त्यांना जबर मार लागला आहे. तेव्हा तुम्हाला आमच्या माता-भगिनी दिसल्या नाही का? तुम्ही लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर केवळ 10 दिवसांची निलंबनाची कारवाई केली. त्याचवेळी आम्हाला तुमची मराठ्यांविषयीची नियत दिसली, असे मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समाचार घेतला. माझी व देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली असताना एकनाथ शिंदे उगीचच मध्ये पडले. माझे मनोज जरांगेंशी कोणतेही देणेघेणे नाही. मी अशांचा करेक्ट कार्यक्रम करतो असे ते म्हणाले. पण आता मराठा समाजच आता असे बोलणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल. शिंदेंची मराठा समाजात इज्जत होती. पण त्यांनी समाजाला काय दिले? असे जरांगे म्हणाले.