नागपूर : वृत्तसंस्था
भाजपच्या पहिल्या यादीत नागपूर भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्यामुळे गदारोळ उडाला होता. उद्धव ठाकरे यांनी तर थेट भाजप सोडून गडकरींनी आमच्याकडे यावे. आम्ही त्यांना निवडून आणू असा दावा केला होता.
मात्र बुधवारी जाहीर झालेल्या यादीत पहिल्या क्रमांकावर गडकरी यांचे नाव आहे. त्यामुळे उद्धव यांच्या दाव्यातील हवा गुल झाली आहे.देशातील पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलून टाकणारे मंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडकरींनी २०१४ मध्ये २ लाख ८४ हजार ८४८ इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केला होता.
त्यांनी नागपूरमधून सलग चारवेळा विजयी झालेले काँग्रेसचे विलास मुत्तेमवार (प्राप्त मते ३ लाख २९१९) यांचा पराभव केला होता. गडकरी यांनी ५ लाख ८७ हजार ७६७ (झालेल्या मतदानापैकी ५४.१७ टक्के) मते घेतली होती. या निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये तब्बल १५.६८ टक्के वाढ झाली होती.