नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना नवीन सरकारच्या पहिल्या १०० दिवसांची आणि पुढील पाच वर्षांची रूपरेषा तयार करण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रविवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या पंतप्रधानांनी मंत्र्यांना आपापल्या मंत्रालयातील सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेऊन नवीन सरकारच्या पहिल्या १०० दिवसांचा आणि पुढील पाच वर्षांचा अजेंडा व्यवस्थित अंमलात कसा आणता येईल यावर चर्चा करण्यास सांगितले. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही बैठक झाली. मंत्रिमंडळाने निवडणूक आयोगाची शिफारस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवून सात टप्प्यांतील संसदीय निवडणुकांच्या तारखा अधिसूचित करण्याची प्रक्रियाही सुरू केली.
पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला १०२ जागांसाठी मतदानाची पहिली अधिसूचना २० मार्च रोजी जारी केली जाईल. अधिसूचना जारी होताच विशिष्ट टप्प्यांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू होईल. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने ३ मार्चला ‘विकसित भारत २०४७’ साठी विकास आराखडा आणि पुढील पाच वर्षांच्या तपशीलवार कृती आराखड्यावर विचारमंथन केले होते. मंत्रिमंडळाच्या दिवसभर चाललेल्या बैठकीत जूनमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तत्काळ पावले उचलण्याच्या १०० दिवसांच्या कार्यसूचीवर चर्चा करण्यात आली होती. विकसित भारतसाठी विकास आराखडा दोन वर्षांपेक्षा जास्त सखोल तयारीचा परिणाम आहे आणि सर्व मंत्रालयांचा समावेश असलेला सरकारचा दृष्टिकोन त्यातून प्रतिबिंबित होतो, असे तेव्हा सांगण्यात आले होते.