नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीत सामील होऊन लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. चार दिवसांत दुसऱ्यांदा दिल्लीत आलेल्या राज ठाकरे यांच्या महायुतीतील सहभागावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.
मनसेला लोकसभेच्या किती जागा मिळतील याकडे लक्ष लागलेले आहे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता राज हे त्यांचे पुत्र अमित ठाकरे तसेच अन्य सहकाऱ्यांसोबत चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाले. शाह यांच्या निवासस्थानापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हॉटेल ताज मानसिंह येथे ते डेरेदाखल झाले. राज शाह बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
राज दिल्लीत पोहोचले तेव्हा भाजप मुख्यालयात शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची महाराष्ट्र भाजप कोअर समितीचे सदस्य फडणवीस आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक सुरु होती. राज्यातील उरलेल्या २८ जागांचे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये कसे वाटप करायचे यावर त्यांची चर्चा झाली. मंगळवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून त्यात राज्यातील भाजप उमेदवारांची नावे निश्चित होणार आहे.