पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रीच्या वादातून एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. झोपेत असतानाच मुलावर कोयत्याने आणि धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मैत्रीत झालेल्या गैरसमजातून २ जणांनी मिळून आपल्याच मित्राची हत्या केल्याचं समजलं आहे. पुण्यातील पानशेत रस्त्यावरील मणेरवाडी येथील आनंदवन सोसायटीत ही थरारक घटना घडली आहे. प्रकाश हरिसिंग रजपूत (वय १५) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश हा खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता ९वीमध्ये शिकत होता. दररोजप्रमाणे तो शाळेत गेला. १०.३० वाजता शाळा सुटल्यावर तो घरी आला. मणेरवाडी हद्दीतील मह डोंगरावरील आनंद सोसायटीतील फार्ममधील घरात तो झोपला होता.
या झोपेनंतर आपल्याला पुन्हा कधीच सकाळ पाहता येणार नाही, याची पुसटशी कल्पना देखील त्याच्या मनात नव्हती. झोपेत असतानाच हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयता आणि धारधार शस्त्रांनी वार केला. जीव वाचवण्यासाठी तो घरातून पळत सुटला. मात्र, शंभर फूट अंतरावर तो कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि हल्लेखोर तरुण (२ अल्पवयीन) यांची एक मैत्रीण होती. हल्ला करणाऱ्या एका मुलाशी ती मुलगी बोलत नव्हती. प्रकाशच्या सांगण्यावरून ती माझ्याशी बोलत नसल्याचा राग मनात ठेवून त्याने हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.