नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शंभर कोटींच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे ‘सूत्रधार’ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज पीएमएलए न्यायालयाने २८ मार्चपर्यंत सहा दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी केली.
ईडीने अटक केल्यावर केजरीवाल यांना राऊज अॅव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल एस. व्ही. राजू आणि झोएब होसैन यांनी, तर केजरीवाल यांच्या वतीने अभिषेक सिंघवी, रमेश गुप्ता आणि विक्रम चौधरी यांनी तीन तास जोरदार युक्तिवाद केला. केजरीवाल यांनी ईडीचे अधिकारी कपिल राज आणि सत्यव्रत यांची हेरगिरी करणारा १५० पानांचा अहवाल त्यांच्या घरी सापडल्याचा आरोप ईडीने केला.
हा केवळ शंभर कोटींचाच घोटाळा नसून लाच देणाऱ्यांनी कमावलेल्या नफ्यातून सहाशे कोटींचाही समावेश असल्याचा दावा केला. मद्य धोरण तयार करणारे केजरीवाल हेच या घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा दावा एस व्ही राज यांनी केला