ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तरुणीचे खंडणीसाठी अपहरण नंतर खून

पुणे : वृत्तसंस्था

लातूर येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका २२ वर्षांच्या तरुणीचे तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी अपहरण केले. मात्र, त्यानंतर पैसे मिळाले, तरी तरुणी घरी आपले नाव सांगेल या भीतीने तिचा खून करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकला. खून केल्यानंतर आरोपींनी तरुणीच्या मोबाइलवरून तिच्या कुटुंबीयाकडे ९ लाखांची खंडणीदेखील मागितली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक केल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय २२, रा विमानतळ, मूळ रा. हरंगुळ बुद्रूक, ता. लातूर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिवम फुलावळे, सागर जाधव आणि सुरेश इंदोरे या तिघांना अटक केली आहे. मयत तरुणीचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे (४९) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात ३० मार्च रोजी अपहरणाची तक्रार दिली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, मूळची लातूरची असलेली भाग्यश्री वाघोली परिसरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ३० मार्चच्या रात्री नऊच्या सुमारास ती विमानतळ परिसरातील फिनिक्स मॉल येथून बेपत्ता झाली होती. दरम्यान मुलीसोबत संपर्क होत नसल्याने तिच्या आई-वडिलांनी तक्रार दिली होती. याच कालावधीत तिच्या आई-वडिलांच्या मोबाइलवर खंडणीसाठी मेसेजही आला. नऊ लाख रुपये द्या, अन्यथा मुलीला मारून टाकू, अशी धमकी त्यामध्ये देण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास करून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीमध्ये या घटनेला वाचा फुटली. तिन्ही आरोपी मयत तरुणीचे मित्र आहेत. प्राथमिक माहितीनुसार, कर्जबाजारीपणा आणि लालसेतून आरोपींनी हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!