नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या घटना घडत असतांना आता नागपूर शहरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नागपूरच्या मानकापूर परिसरात भरधाव ट्रकने 12 गाड्यांना धडक दिली आहे. रविवारी रात्री कंटेनरने सिग्नलवर उभ्या असलेल्या डझनाहून अधिक कार-दुचाकींना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होतील की अनेक कारचा चेंदामेंदा झाला व एक कार तर थेट दुसऱ्या कारवरच चढली. या अपघातात 15 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते.
मिळालेल्या माहितीनुसार, धडक दिलेल्या वाहनांमध्ये 9 कार, एक रुग्णवाहिका आणि दोन दुचाकी वाहनांचा समावेश आहे. या धडकेत सुमारे पाच ते सहापेक्षा जास्त कारचे नुकसान झाले आहे. अनेक कारचा अक्षरशः चुराडा झाला. दरम्यान, कारमधील अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातग्रस्त प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर घटनास्थळावर किंकाळ्यांचाच आवाज होता.
चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यामुळे तो समोर लाल सिग्नल असल्यामुळे थांबलेल्या वाहनांवर मागून धडकला. या कंटेनरने आधी एका कारला धडक दिली. त्यानंतर काही कार अन् दुचाकी फरफटत गेल्या. यामध्ये एक दुचाकी कंटेनरखाली चिरडली गेली. या अपघातात रुग्णवाहिकेचाही चेंदामेंदा झाल्याचे समोर आले आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तीन ते चार कारचे दरवाजेच या अपघातानंतर उघडत नव्हते. त्यांना घटनास्थळावरील नागरिकांनी कारचे दरवाजे ओढून बाहेर काढले. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अनेक जण स्वत:च उपचारांसाठी दवाखान्यात गेले. नुकसान झालेली बहुतांश वाहने नवीनच असल्याचेही सांगण्यात येत आहे.