मुंबई : वृत्तसंस्था
आज मनसेचा शिवाजी पार्कवर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर तर या चर्चांनी जोर धरला. त्यावर गुढीपाडव्याच्या सभेत मी सर्व काही स्पष्ट करणार असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे एकूणच आजच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता वडेट्टीवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे हे वाघ माणूस आहेत. मात्र त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच त्यांना पिंजऱ्यात अडकवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे अशी शंका वडेट्टीवार यांनी उपस्थित केली आहे.
वडेट्टीवार यावेळी बोलतांना म्हणाले, ”राज ठाकरे हे वाघ माणूस आहेत. मात्र त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. राज ठाकरे हे दिल्लीच्या सत्तेपुढे कधीही झुकणार नाही, असे ते वारंवार सांगत होते. मात्र, दिल्लीची वारी त्यांना करावी लागली. यात कुठेतरी त्यांना अडचणीत आणण्याचे, त्यांना पिंजऱ्यात अडकवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होतंय का, अशी शंका सध्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे”, असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासह राज ठाकरे झुकणार नाहीत असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. ”राज ठाकरे दिल्लीच्या तक्तापुढे झुकणार नाहीत, ही प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा आहे. म्हणूनच आज राज ठाकरे जे काही बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असेल”, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.