नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात लोकसभा निवडणुक सुरु झाली असून महाराष्ट्रात देखील लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात होणाऱ्या पाच लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर आता काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची 13 एप्रिल रोजी सभा होणार आहे. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेत्यांमध्ये विविध जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदारसंघात ही सभा होणार असल्याने त्यांच्या माध्यमातून एक समिती गठीत करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पहिला टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि वायनाड मधील काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी हे 13 एप्रिल रोजी विदर्भात सभा घेणार आहेत. त्यांच्या सभेची काँग्रेसच्या नेत्यांच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गर्दी जमवण्यासाठी तसेच विविध मुद्द्यांवर काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा झाली. राहुल गांधी यांची सभा विक्रमी मतदारांच्या उपस्थितीत व्हावी, यासाठी काँग्रेसने तयारीला सुरुवात केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच चंद्रपूर येथे सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर अनेक आरोप केले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 10 एप्रिल रोजी नागपूर आणि रामटेक मतदारसंघासाठी सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर राहुल गांधी यांची सभा होणार असल्याने त्यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी या सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.