मुंबई : वृत्तसंस्था
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिल्याचे जाहीर होताच आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भाजपचे नेते पियूष गोयल यांच्या प्रसाचारासाठी उत्तर मुंबईत सभा झाली. या सभेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. ‘खरं इंजिन आमच्यासोबत आलं… आता आमची ताकद वाढली.’, असं फडणवीस यावेळी म्हणाले. त्याचसोबत त्यांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यासोबत इंडिया आघाडीवर देखील निशाणा साधला. ‘इंडिया आघाडीमध्ये प्रत्येक जण स्वत:ला इंजिन समजतो.’, असा टोला त्यांनी लगावला.
या सभेत भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या जनतेला आवाहन केले की, ‘तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेच्या उमेदवाराचे बटन दाबले तर ते मत मोदींना मिळेल. अन्य कोणतेही बटन दाबले तर ते मत राहुल गांधींना मिळेल. कारण उद्धवजींचे नेत राहुल गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी. आमचे नेत मोदीजी, शिंदेसाहेबांचे नेते मोदीजी, अजित पवारांचे नेते मोदीजी आहेत. आमची अशी ट्रेन आहे ज्या ट्रेनला मोदींजीचे इंजिन आहेत. या ट्रेनला आम्ही सगळ्या बोग्या लावल्या आहेत. आम्ही सगळे ताकद घेऊन त्या ट्रेनमध्ये बसलो आहोत. आमच्या ट्रेनमध्ये सामान्य लोकांना बसायला जागा आहे.’
विरोधीपक्षाच्या इंडिया आघाडीवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ते म्हणाले की, ‘इंडिया आघाडीमध्ये प्रत्येक जण स्वत:ला इंजिन समजतो. एक जण इंजिन बोरीवलीकडे नेतो, दुसरा दक्षिण मुंबईकडे नेतो. एक उत्तर मुंबईकडे नेतो. एक दुसरा पश्चिमेला नेतो. त्यामुळे त्यांची ट्रेन हालतच नाही. इंजिन हे कितीही पावरफुल असले तरी त्यात बसायला ड्रायव्हरला जागा असते. आमचे तसे नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासाची ट्रेन घेऊन जाणार आहे.’
तसंच, राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिला यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘मुंबईकरांनी विचार करायचा की मोदीजींच्या इंजिनमध्ये बसायचे की राहुल गांधीच्या न चालणाऱ्या इंजिनमध्ये बसायचे. खरं इंजिन काल आमच्यासोबत आलं. मुंबईतले चालणाऱ्या इंजिनने सांगितले की मोदीजींच्या इंजिनलाच आम्ही ताकद देणार आहोत. राज ठाकरेंनी मोदींजींना पाठिंबा दिला. राज ठाकरेंनी काल स्पष्टपणे सांगितले या देशाचा विकास मोदीच करू शकतात. त्यांनी कुठलीही शर्त न ठेवता बिनशर्त मोदींना पाठिंबा दिला. त्यांचे आभार मानतो. देशाला काय हवंय याची नाडी राज ठाकरेंना कळाली. त्यामुळे त्यांनी जनतेच्या हिताचा निर्णय घेतला. आता आपली एक मजबूत गाडी झाली आहे.’, असे म्हणत फडणवीसांनी राज ठाकरेंचे आभार मानले.