वारकरी संप्रदायाच्या विचारातच जीवनाचे खरे कल्याण
किणी येथील किर्तन सोहळ्यात सदगुरु ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे प्रतिपादन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
प्रत्येक मानवाने आपले जीवन जगत असताना वारकरी संप्रदायाच्या विचाराने जीवन जगून त्याचे अनुकरण केले पाहिजे तर जीवनाचे खऱ्या अर्थाने कल्याण होईल,असे विचार पंढरपूर श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष तथा औसा संस्थांनचे प्रमुख ह.भ.प सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मांडले. अक्कलकोट तालुक्यातील किणी येथे ग्रामस्थांतर्फे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यात दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
‘नमावेते नित्य सद्गुरूंची पाय, या एकनाथ महाराजांच्या अभंगावर त्यांनी या कीर्तनात विचार मांडले आणि अभंग सोडविला.कर्म, भोग, प्रारब्ध, संचित आणि क्रियमान यांनी जगात कोणाला सोडले नाही. प्रभू रामचंद्राला देखील राजघराण्यात जन्म दिला पण वनवास दिला.लक्ष्मणाला सुंदर पत्नी दिली पण चौदा वर्षाचा वनवास दिला.भरताला राज्याभिषेक दिला पण राज्यासनापासून दूर ठेवले.माऊली प्रत्यक्षात भगवंतांचे अवतार पण त्यांच्या आई-वडिलांना देखील देह दंड दिला.म्हणून वाहिल्या उदवेग, दुःखाची केवळ भोगनी फळ संचिताचे,जैसी स्थिती आहे तैसा तू राहे, कौतुक तू आहे संचितांचे. भगवान शंकराने जगाला सांगितले की, मी चक्रवर्ती आहे पण त्यांना स्मशानाचे भस्म लावावे लागायचे. विरक्तीसाठी ते डोंगरावर राहायचे.स्वतःच्या सासऱ्याकडून यज्ञामध्ये त्यांना अपमान सहन करावा लागला.त्यामुळे प्रत्येक मानवाने आपल्या जीवन जगत असताना वारकरी संप्रदायाच्या विचाराने जगले पाहिजे,कारण माळ घालणे, गंध लावणे, वारी करणे, रंजले गांजले यांची सेवा करणे आणि एकादशी सारखा महान वृत करून दूरव्यसनापासून दूर राहणे व जीवनाचे कल्याण करून घेणे हे फार महत्त्वाचे आहे,असे महाराजांनी सांगितले. बुधवारी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन असल्यामुळे प्रारंभी त्यांनी साधू संतांचे अनेक उदाहरण देत महत्त्व आधारित केले.
या सप्ताहमध्ये किणी येथील श्री मल्लिकार्जुन शिक्षण संस्थेच्यावतीने अशोक पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी नवीन मंदिरासाठी जागा दान केली व किणीचे सुपुत्र तथा पुण्याचे उद्योजक स्वामीनाथ जाधव यांनी या नवीन मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची शाळीग्राम मूर्ती देण्याचे जाहीर केले.त्याबद्दल महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.त्याशिवाय सरपंच विनायक जाधव यांनी स्वतः महाराजांच्या हस्ते माळ घालून घेऊन गावाला व्यसन मुक्तीचा संदेश दिला तसेच विकासाला व संस्काराला योग्य दिशा दिली.
यावेळी गुरुनाथ मठ,आप्पासाहेब पाटील, शरद किणीकर,अण्णपा अळळीमोरे, उल्हास पाटील आदींच्या सहकार्याने मंदिर पूर्ण करण्याचा संकल्प सोडण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह.भ.प आबा महाराज कुरनूरकर, रावसाहेब भोसले, शिवाजी कोटमाळे,शिरीष किणीकर,राजेंद्र पोतदार,चंद्रकांत माने ,चोपदार शिवाजी शितोळे आदींनी सहकार्य केले.या किर्तन सोहळ्यामध्ये कुरनूर,चुंगी,हाळ वागदरी, मोट्याळ, सुलतानपूर, गुळहळळी, नांदगाव ,काझीकणबस, किणीवाडी,मोगा,शहापूर आदी गावच्या दिंड्या आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.