छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, जालना जिल्ह्यांना बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारी विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तडाखा दिला. यात फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. गंगाखेड तालुक्यातील विळेगाव येथील शेतशिवारात वीज कोसळून ६० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर हिंगोली व जालना जिल्ह्यांतील भोकरदन तालुक्यात तुफान गारपीट झाली.
परभणीत झाडे पडली उन्मळून परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ढंग दाटून आले. जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. परभणी शहरात रात्री उशिरापर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. या वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच बुधवारी सायंकाळी ६. च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पूर्णा, सोनपेठ, परभणी, जिंतूर, सेलू आदी तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे.