मुंबई : वृत्तसंस्था
सध्या माढा लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे. भाजपने माढ्याच्या जागेवर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली असताना त्यांच्या नावाला भाजपमधील नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील रामराजे नाईक-निंबाळकर गटाने विरोध सुरू केला आहे; परंतु या जागेवर कार्यकर्त्यांनी आता वाद न करता युती धर्म म्हणून कामाला लागावे, असे स्पष्ट आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी माढ्यातील आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना दिले आहेत.
शुक्रवारी, अजित पवार यांनी – देवगिरी शासकीय निवासस्थानी ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत माढ्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या वेळी माढ्याच्या जागेबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केली. भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात रणजित नाईक-निंबाळकर यांना दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचे या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत सांगितले. यावर येत्या एक-दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. तर अजित पवार यांनी माढ्याच्या जागेवर आता वाद न करता कार्यकर्त्यांना युती धर्म म्हणून निवडणुकीच्या कामाला लागण्याचे निर्देश दिले.
भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उघड विरोध केला आहे. उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच रामराजे यांनी रणजितसिंह यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. याबद्दल रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची चर्चा झाल्यानंतर पवारांनी हा विषय मिटवण्यासाठी शुक्रवारी मुंबईत बैठक बोलवली होती. या बैठकीत मित्रपक्षांच्या उमेदवारांचे काम करण्याच्या सूचना पवारांनी केल्याचे समजते.