पुणे : वृत्तसंस्था
मनसेला रामराम केल्यानंतर वसंत मोरे हे पुण्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी आधी महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र मविआसोबत सूत जुळले नाही तेव्हा त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना वंचितकडून पुण्यात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. मनसेकडून महायुतीचा प्रचार केला जाणार आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर आता मनसेला रामराम केलेल्या वसंत मोरे यांनी नरमती भूमिका घेतली आहे. आपण लवकरच राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे वसंत मोरे यांनी म्हंटले आहे.
पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी महापौर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा सामना वसंत मोरे करावा लागणार आहे. त्यामुळे पुणे लोकसभेची लढत तिरंगी होणार आहे. यामुळे वसंत मोरे आता राज ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पाठिंबा मागण्याचा मी प्रयत्न करेन. परंतु काय करावे, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असणार आहे, असे वसंत मोरे म्हणाले.
यावेळी मोरे म्हणाले, ”साहेब नाराज आहेत, पण बघू काय करतात. आमचे मतभेद झालेत पण मनभेद झालेले नाहीत. मी त्यांच्या सोबत 25 वर्ष होतो. काय होते हे घोडा मैदान जवळ असेल तेव्हा बघू”, असे सूचक विधान मोरे यांनी केले. त्यामुळे वसंत मोरे आणि राज ठाकरे यांची भेट होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.