नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा रविवारी प्रसिद्ध करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात येईल. भाजप आपल्या जाहीरनाम्याचा उल्लेख संकल्पपत्र असा करत असतो. भाजपने यंदा आपला जाहीरनामा लोकांच्या सूचना, सल्ल्यांमधून तयार करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात प्रक्रिया सुरू करत लोकांचे मत व अपेक्षा जाणून घेण्यासाठी देशभरात विशेष रथ रवाना करण्यात आले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार यंदाच्या जाहीरनाम्यात गरीब, युवक, शेतकरी आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवण्यात येईल. २०४७ सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य ठेवून त्या दृष्टीने जाहीरनाम्यात योजनांचा उल्लेख असेल. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवणे, अयोध्येत राममंदिर बांधणे आणि समान नागरी कायदा लागू करणे.