नागपूर : वृत्तसंस्था
मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलणार, असे विरोधक कितीही दावा करत असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलणे अशक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. रविवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी उपस्थित भीम अनुयायांना संबोधित करताना शिंदे बोलत होते.
दरम्यान, जनतेला आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देताना शिंदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला अनुसरूनच राज्याचा कारभार सुरू आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश बाबासाहेबांनी सर्वांना दिला आहे. राज्य शासनानेही इंदू मिलच्या जागी भव्य स्मारक उभे करायला सुरुवात केली आहे. नागपूरमधील दीक्षाभूमीचे जतन, संवर्धन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनमधील घर खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतर करून शासनाने बाबासाहेबांना खरी मानवंदना दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला आहे. राज्यातदेखील हा दिवस साजरा होत आहे.