धाराशिव : वृत्तसंस्था
राज्यात लोकसभा निवडणूक सुरु झाली आहे, तर आज देखील शिवसेनेच्या शिंदे गटातील काही नेते जागावाटप बाबत भाजपला धारेवर धरत आहे. नुकतेच धाराशिव लोकसभा मतदारसंघ पारंपरिक कडवट शिवसैनिकांचा मतदारसंघ आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या तीन नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेतला. अशाच पद्धतीने एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर शिवसैनिक व मी स्वत: स्वस्थ बसणार नाही. ८ वेळा शिवसेनेचा खासदार निवडून गेला आहे. अशा स्थितीत दुसऱ्या पक्षाला मतदारसंघ देणे हा तमाम शिवसैनिकांवर अन्याय असल्याची खदखद व्यक्त करीत शिंदे गट शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी भाजपलाच लक्ष्य केले. गुरुवारी माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनीही भाजपवर टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने चक्रव्यूहात अडकवले आहे. भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचा बळी जात आहे, असे ते म्हणाले होते.
धाराशिव लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभा घेतली. या सभेत तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच थेट भाजप नेत्यांवर हल्ला चढवत उमेदवारी न मिळाल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली. अब की बार ४०० पार, विश्वनेता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक जिंकायची असल्याने सर्व माता-भगिनींसाठी मी छातीचा कोट करून उभा राहीन, असे आश्वासन देत प्रचारात सहभागी होण्याचे मंत्री सावंत यांनी आश्वस्त केले.
दरम्यान, गुरुवारी मराठवाड्यातील शिंदेसेनेचे नेते, माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनीही भाजपवर तोफ डागली होती. ते म्हणाले होते की, आमच्या हक्काच्या जागा भाजप ओढून घेत आहे. सर्वेक्षणाचा अहवाल विरोधात आहे, असे दाखवून विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जात आहे. रामटेकमधून कृपाल तुमाने, यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी यांची तिकीटे भाजपने अशीच दबाव टाकून कापली, हे योग्य नाही.