नाशिक : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या २५ दिवसांपासून बंद असलेला कांदा लिलाव सोमवारी पुर्ववत झालेला असताना आज पुन्हा एकदा कांदा लिलाव बंद पडला आहे. हमाल- व्यापारी यांच्या लेव्ही कपातीच्या प्रश्नावरुन सुरु असलेला वाद पुन्हा उफाळून आला आहे. त्यामुळे कांद्याचा लिलाव ठप्प पडल्याचे सांगण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, नाशिकच्या मालेगाव, मुंगसे पिंपळगाव-बसवंत, देवळा, येवला सह अन्य बाजार समितीतीत बाजार समितीच्या आवारात हमाली- तोलाई- वराई कपात न करता कांद्याचे लिलाव सुरु झाले होते. मात्र दोन दिवस उलटत नाही तोच हमाल- व्यापारी यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत बाजार समितीत सुरु झालेले लिलाव बंद पाडले आहेत.
तसेच जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरुन लेव्ही प्रश्नावरुन निकाल लागत नाही तोपर्यंत कांदा लिलावातून रक्कम कपात करावी अशी भूमिका घेतली. त्यामुळे पुन्हा बाजार समितीमधील लिलाव बंद पडले आहेत. पुढील सुचना येईपर्यंत कांद्याचे लिलाव बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सोमवारी बाजार समितीमधील लिलाव सुरु होण्यापुर्वी बाजार समिती प्रशासनाने शेतक-यांकडून कुठलीही हमाली-मापारी-तोलाई याचे पैसे कपात केली जाणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती मात्र ४८ तास उलटत नाही तोच हमाल-मापा-यांनी याला विरोध केला त्यामुळे बाजार समितीत सुरु झालेले लिलाव पुन्हा बंद पडले आहे.