माढा : वृत्तसंस्था
शेतमालाला नसलेला भाव, वाढलेली महागाई, तरुणांमधील बेरोजगारी आणि या सरकारच्या धोरणांविरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचे काम करणारे मोदी सरकार देशाला हुकूमशाहीच्या दिशेने घेऊन चालले असल्याची टीका शरद पवारांनी मोडनिंब (ता. माढा) येथील जाहीर सभेत केली. माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना खा. पवार म्हणाले, २०१४ मध्ये मनमोहन सिंग यांच्यावर टीका करत महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. पन्नास टक्के महागाई कमी करण्याची भाषा बोलणाऱ्या मोदींच्या काळात पेट्रोल ७१ रुपयांवरून १०६ रुपयांवर गेले. ४१० रुपयांचा गॅस सिलिंडर ११६९ रुपयांवर गेला. टंचाईच्या काळात पाकिस्तानमधून कांदा आयात करणाऱ्या मोदींनी कांदा निर्यातबंदी केली आणि शेतकऱ्यांचे नुकसान केले.
दिल्लीचे सलग तीन वेळा मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था बदलून टाकत असताना त्यांना तुरुंगात टाकण्याचे काम केले. सामान्य माणसाचे अधिकार संकटात टाकणाऱ्या व दिलेला शब्द न पाळणाऱ्या मोदींचे सरकार म्हणजे लबाडाचे आमंत्रण आहे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या पंतप्रधानांनी देशाची लोकशाही टिकवण्याचे काम केले. ज्यांनी देशाचा विचार केला, त्यांच्यावर टीका करणारे मोदी लोकांमध्ये संघर्ष कसा वाढेल याचा विचार करत आहेत.