लंडन – कोरोना लसीबाबत ब्रिटनमधून एक आनंदाची बातमी आली आहे. कारण जगाचे लक्ष लागून असलेल्या ब्रिटनमधील फायजर कोरोना लस सर्वसामान्यांना दिली जाण्याचे काम सुरू झाले असून आयर्लंडमधील एका 90 वर्षीय महिलेला फायझर बायोएनटेकची लस देण्यात आली आहे. करोनाची लस दिली जाणारी ती जगातली पहिली व्यक्ती ठरली आहे.
ब्रिटनमध्ये सामूहिक लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला असून मार्गारेट किनान हे पहिली लस टोचण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मार्गारेट किनान या एनिस्किलेन येथील रहिवासी असून लस दिल्यानंतर फार बरे वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
कोवेंट्री युनिव्हर्सिटी हॉस्पिटल येथे त्यांना लस देण्यात आली. किनान एक आठवड्यांनी 91 वर्षांच्या होणार आहेत. आपल्या वाढदिवसाच्या अगोदरच आपल्याला ही सगळ्यात मोठी भेट मिळाली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. करोनाची लस दिली जाणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरल्याचा मान मिळाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या उपस्थितीतच लस घेतली.
आतापर्यंत लसीच्या चाचणीच्या टप्प्यात अनेक स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. मात्र चाचण्या पूर्ण झाल्यानंतर लस मिळणाऱ्या किनान पहिल्या नागरिक असल्याचे बीबीसीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
आपल्या मित्रपरिवारात मॅगी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या किनान एका ज्वेलर शॉपमध्ये असिस्टंट म्हणून काम करतात. त्या चार वर्षांपूर्वी निवृत्त झाल्या आहेत. त्यांना एक मुलगी व एक मुलगा असून चार नातवंडे आहेत.
त्यांना लस देतानाच्या क्लिप जारी करण्यात आल्या असून त्यांना लस दिली जात होती, त्यावेळी त्यांनी मास्क घातला होता. गेले काही महिने फार खडतर होते. मात्र आता अंधकार दूर होत असून पुन्हा प्रकाशाचे किरण दिसू लागले आहेत, असे किनान यांना लस देणाऱ्या परिचारिका मे पार्संस यांनी म्हटले आहे. पार्संस या मूळच्या फिलिपिन्स येथील असून त्या गेल्या 24 वर्षांपासून ब्रिटनच्या आरोग्य सेवेत काम करत आहेत.