जुमलेबाज सरकारला चारशेचा आकडा विकासासाठी नव्हे तर घटना बदलण्यासाठी हवाय
माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचा हल्लाबोल
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
देशात कोणत्याही पक्षाचे बहुमताचे सरकार येण्यासाठी २७२ च्या संख्याबळाची गरज आहे असे असताना केंद्रातील जुमलेबाज सरकारने अबकी बार चारसो पारचा नारा दिला आहे.हा त्यांचा नारा सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी नाही तर भारताची राज्यघटना बदलून मनुवादी सरकार आणण्यासाठी आहे,अशी घनाघाती टीका काँग्रेसचे खासदार तथा राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केली.
मंगळवारी, अक्कलकोट शहरातील जुना राजवाडा येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. व्यासपीठावर माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे,दुधनी बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे,जेष्ठ नेते अशपाक बळोरगी,मल्लिकार्जुन पाटील,रईस टिनवाला,व्यंकट मोरे,सुनीता हडलगी,अशपाक अगसापूरे,सुनील खवळे, अरुण जाधव,बाबा पाटील, मुबारक कोरबू,राम जाधव,सुनील कटारे,विश्वनाथ भरमशेट्टी, सिद्धार्थ गायकवाड, श्रीशैल अळोळी,शाकिर पटेल,मैनूद्दीन कोरबू,सुनंदा भकरे आदींची उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार हंडोरे म्हणाले,दहा वर्षापूर्वी विरोधकांनी लोकांना अशा काही घोषणा दिल्या. ज्यातून लोक बळी पडावेत आणि त्यांचे सरकार यावे ही भावना त्या पाठीमागे होती परंतु त्यांनी दिलेले अच्छे दिनचे स्वप्न असेल किंवा आता गॅरंटीचा नवा भुलभुलया असेल हे सर्व आत्ताच्या सरकारचे प्रयत्न फेल गेलेले आहेत.आता जनता हुशार आहे त्यांना सर्व ओळखून आहे.आता पुन्हा नव्या गॅरंटीचे आश्वासन ते देत फिरत आहेत.जुन्या गॅरंटीची पूर्तता झालेली नसताना नव्या घोषणा देऊन पुन्हा जनतेची दिशाभूल चालू आहे.ही दिशाभूल ह्या फसव्या घोषणा यावेळी जनता कदापी सहन करणार नाही.सध्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसची राज्यात सत्ता आहे त्या ठिकाणी आम्ही जी आश्वासन जनतेला दिली ती तंतोतंत पाळत आहोत.आम्ही खोटे बोलून सत्तेत आलेलो नाही.कर्नाटकमध्ये आम्ही नुकतीच सत्ता मिळवली.त्या ठिकाणीही आम्ही ज्या घोषणा केल्या.त्याची अंमलबजावणी केली.आज देशाचे नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना हमीभाव, कर्जमाफी यासारख्या गोष्टींचे जे आश्वासन दिलेले आहे. ते आमचे सरकार आल्यानंतर आम्ही निश्चितच पूर्ण करू. देशात आज आणीबाणी सारखी स्थिती आहे.
राज्यघटना लिहिताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तीन वर्षे घालवले तेव्हा कुठेही सर्वधर्मसमभावाची राज्यघटना अस्तित्वात आली आणि ती आज वर्षानुवर्ष आपल्या देशामध्ये कार्यरत आहेत पण जेव्हा हे हिटलर पेक्षाही भयानक असलेले नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हाही राज्यघटनाच ते बदलू पाहत आहेत. या निवडणुकीत जर आपण हरलो तर २०२९ ची निवडणूक होणार नाही.त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि सोलापूर लोकसभेमधून आमदार प्रणिती शिंदे सारख्या युवा तडफदार आमदारना खासदार करून लोकसभेत पाठवा,असे आवाहन त्यांनी केले.माजी मंत्री म्हेत्रे म्हणाले,खासदार चंद्रकांत हंडोरे राज्यामध्ये ज्यावेळी मंत्री होते.त्यांचे त्यावेळी अक्कलकोटवर विशेष लक्ष होते. त्यावेळी त्यांनी तालुक्याला तीन वस्तीगृह दिले. जिल्ह्यात देखील त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या खात्याचा निधी मोठ्या प्रमाणात दिला.त्यामुळे विकास होऊ शकला.एवढा विकास करूनही त्यांनी आम्हाला आभार मानण्याची संधी त्यांनी कधीच दिली नाही. पण या सभेच्या निमित्ताने मी त्यांचे निधी दिल्याबद्दल आभार मानतो,असेही ते म्हणाले.कुरनूरचे सरपंच व्यंकट मोरे यांनी भाजपवर सडकून टीका केली.विरोधक महाविकास आघाडीच्या नेत्यांवर नुसत्या टीका करत आहेत ज्या रस्त्यावरून तुम्ही फिरता ते रस्ते भाजपने केले असे ते सांगत सुटलेत पण विरोधी पक्षाचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते हे ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने बांधली आहे.हे त्यांनी विसरू नये.त्यांचा पराभव या निवडणुकीत निश्चित आहे,असे ते म्हणाले.
याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बंदेनवाज कोरबू, शिवसेना ठाकरे गटाचे आनंद बुक्कानुरे,सोपान निकते, शिवा संघटनेचे प्राध्यापक परमेश्वर अरबाळे आदींची भाषणे झाली.या सभेत अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चालक एकता संघ व जय हिंद ट्रक चालक-मालक संघटनेचे विठ्ठल चव्हाण यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. या सभेला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ,पदाधिकारी व शहरातील नागरिक,महिलांची प्रचंड गर्दी झाली होती.सभेचे सूत्रसंचालन सलीम पटेल यांनी केले.
देशाला कर्जबाजारी करणाऱ्या भाजपला हद्दपार करा
देश स्वतंत्र झाल्यापासून ६५ वर्षात ५५ लाख कोटी रुपये कर्ज झाले पण मागच्या दहा वर्षात त्यांनी हा आकडा २०६ लाख कोटीवर नेऊन ठेवला. यावरून देश प्रगतीकडे जात आहे की अधोगतीकडे हे ओळखा आणि येत्या ७ तारखेला मतदान करा.केवळ फसव्या घोषणा करून देशाला लूट करणाऱ्या भाजपला यावेळी हद्दपार करा, असे आवाहन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.जुमलेबाज सरकारला चारशेचा आकडा विकासासाठी नव्हे तर घटना बदलण्यासाठी हवाय