मुंबई : वृत्तसंस्था
देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन महिनाभराचा कालावधी उलटला. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान देखील पार पडलं. आता तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही महायुतीतील काही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
या प्रश्नाचं उत्तर आज दुपारपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या उमेदवाराची घोषणा करणार असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या जागेवरुन शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये मंगळवारी (ता. ३०) रात्री उशिरापर्यंत बैठक आणि चर्चा झाल्याची माहिती आहे. गिरीष महाजन यांनी हेमंत गोडसे यांच्यासोबत जवळपास १ तास चर्चा केल्याची माहिती आहे.
ठाकरे गटाचे नाराज नेते विजय करंजकर यांनी देखील महाजन यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे. नाशिक लोकसभेतून हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी महायुतीकडून शक्तीप्रदर्शन करून नाशिक आणि दिंडोरीचे उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार केले जाणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, गिरीश महाजन यांची उपस्थिती असेल, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीने याआधीच नाशिकमधून आपला उमेदवार जाहीर केला आहे.सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मंगळवारी राजाभाऊ वाजे यांनी महाविकास आघाडीकडून जंगी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता त्यांच्याविरोधात महायुतीकडून हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.