मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ जागांसह देशातील ९४ मतदारसंघात उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तास अगोदर रविवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मतदानापूर्वी शेवटचा रविवार असल्याने तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या लोकसभेच्या ११ मतदारसंघांत रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता.
राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी सभा घेऊन तिसरा टप्पा गाजवला. चारसभांचा धडाका, सभांच्या माध्यमातून झालेले आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी, आश्वासनांनी प्रचाराचा धुरळा उडवत या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. विविध ठिकाणी झालेल्या महाविकास आघाडी व महायुतीच्या प्रचारादरम्यान रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांनी रणसंग्राम गाजला होता.