अक्कलकोट : प्रतिनिधी
काँग्रेसवाले आम्ही सत्तेत आल्यानंतर राज्यघटना बदलणार आहोत असा चुकीचा आणि खोटा अपप्रचार करत आहेत पण या अपप्रचाराला कोणीही बळी पडू नका.राज्यघटना बदलण्याचे खरे पाप मागच्या साठ वर्षात काँग्रेसनेच केले आहे आत्तापर्यंत त्यांनीच ८० वेळा देशाची राज्यघटना बदलली,असा पलटवार देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोटमधील सभेत बोलताना केला.
रविवारी,महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ श्री मल्लिकार्जुन देवालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित विराट जाहीर सभेत ते बोलत होते.व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी,आमदार सचिन कल्याणशेट्टी,आमदार सुभाष देशमुख,आनंद चंदनशिवे, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, शिवानंद पाटील, मिलन कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे, संजीवकुमार पाटील संजय देशमुख, दिलीप सिद्धे,सुनील बंडगर,अविनाश मडीखांबे,अप्पू बिराजदार, परमेश्वर यादवाड, सुरेखा होळीकट्टी, यशवंत धोंगडे, शिवराज स्वामी, अण्णाराव बाराचारी,मल्लिनाथ पाटील आदींसह महायुतीचे घटक पक्ष असलेल्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना गडकरी म्हणाले, देशाला जगामध्ये तीन नंबरचा आर्थिक महासत्ता असलेला देश बनवायचा आहे.ही ताकद फक्त भाजपमध्येच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे स्वप्न आपल्याला यावेळी साकार करायचे आहे. यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद हवा आहे. देशात आज दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सर्व रस्ते भाजपने केले आहेत.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तर अक्कलकोट आणि सोलापूरच्या भागांमध्ये अनेक रस्त्यांची मागणी केली होती.ते सर्व रस्ते आम्ही मंजूर केले आणि नव्वद टक्के रस्ते आता पूर्णही झाले आहेत.आणखीन काही रस्त्यांची मागणी त्यांनी केली आहे ते सर्व रस्ते पण मंजूर करत आहे, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. साखर कारखानदारांच्या बाबतीत बोलताना गडकरी म्हणाले की,जर केंद्र सरकारने इथेनॉल च्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला नसता तर कारखानदारांना शेतकऱ्यांना बिले देणे मुश्किल झाले असते.ती त्यांना देता आली नसती.हे श्रेय भाजप सरकारचे आहे.इथेनॉल निर्मितीला सरकारने चालना दिल्यामुळे आज कारखानदारी व्यवस्थित चालली आहे असे ते म्हणाले. देशात आज पेट्रोल आणि डिझेल आपण आयात करत आहोत. ती हळू हळू आम्ही बंद करण्याचा विचार करत आहोत. इथेनॉलचे एकीकडे उत्पादन वाढवीत आहोत दुसरीकडे इलेक्ट्रिक गाड्या जास्तीत जास्त उत्पादित करून त्या बाजारात आणत आहोत. त्यामाध्यमातून आर्थिक बचत करण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे.देशात ज्या ज्या ठिकाणी आम्ही हायवे बनविले.त्या – त्या ठिकाणी जलसिंचनाला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी हजारो तलाव बनविले.
जेणेकरून त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी मिळाले पाहिजे,ही भूमिका प्रामुख्याने ठेवली. आता तर पुढच्या काळामध्ये शेतातील पाणी शेतात आणि घरातील पाणी घरात ही भूमिका ठेवून भाजप काम करत आहे. कृष्णेचे पुराचे पाणी आपल्या भागात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून शेतीला पूरक ज्या गोष्टी आहेत त्याला प्राधान्य देऊन त्या मार्फतच शेतकरी सक्षम करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. देशाला बलशाली बनविण्यासाठी भाजप प्रत्येक पाऊल पुढे टाकत आहे. आत्तापर्यंत सरकारने जी जी कामे केली ती व्यक्तिगत कुणीही केली नाही,असे मी मानतो.कारण तुम्ही मागच्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये आम्हाला ताकद दिली आणि आम्हाला आशीर्वाद दिला म्हणून हे सर्व शक्य झाले,असा आशीर्वाद पुन्हा द्या आणि विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याची संधी भाजपला द्या, अशा प्रकारचा आवाहन त्यांनी यावेळी केले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यामध्ये मध्यंतरी ज्यावेळी पक्षाने पहिल्या टर्ममध्ये आमदार झालेल्या आमदारांचा एक सर्व्हे केला.त्यावेळी पहिल्या दहा आमदारांमध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा समावेश होता. आत्तापर्यंत त्यांनी जी जी कामे या सरकारकडे आणली.
नेत्यांकडे आणली. ती सर्व कामे मंजूर करून प्रगतीपथावर नेण्याचे काम या सरकारने केले. तशी ताकद सुद्धा अक्कलकोटच्या जनतेने आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठीमागे उभी केली. या पुढच्या काळामध्ये ही ताकद भाजपच्या पाठीमागे लावून आमदार सातपुते यांना अक्कलकोटमधून सर्वाधिक मताधिक्य देऊन लोकसभेत पाठवा,असे आवाहन त्यांनी केले.या सभेला अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील महायुतीतील कार्यकर्ते, गावोगावचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उन्हाचा तीव्र कडाका होता.तापमान ४४ अंशाचेही पुढे होते.तरीही ग्रामीण भागातून कार्यकर्ते,पदाधिकारी उत्स्फूर्तपणे या सभेला हजर झालेले होते. या सभेत भाजपच्या प्रमुख नेतेमंडळींसह महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रासप,रिपाई आणि शिवसेना पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी काँग्रेसचा समाचार घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आणि ते आतापर्यंत कसे निष्क्रिय ठरले याचा पाढा त्यांनी वाचून दाखविला.
गडकरींनी केल्या अक्कलकोटसाठी महत्वाच्या घोषणा
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मागणीवरून गडकरी यांनी अक्कलकोटच्या सभेत नवीन रस्त्यांच्या कामांची घोषणा केली. यात अक्कलकोट ते दुधनी रेल्वे रेल्वे ओव्हर ब्रिज साठी ९७ कोटी, दुधनी ते अक्कलकोट कर्नाटक सीमेपर्यंतच्या रस्त्यासाठी १६ कोटी, नळदुर्ग ते अक्कलकोट १२० कोटी, वागदरी- तोळणूर- नागणसूर मार्गे कर्नाटक सीमेपर्यंत ४०० कोटी, दुधनी ते अक्कलकोट नदीवरील मोठ्या ब्रिज साठी ३२ कोटी, दुधनी बायपास साठी २१२ कोटी तसेच सीआरएफ मधून १५ कोटी रुपये तडवळ भागातील रस्त्यासाठी देण्याची घोषणा केली.
काँग्रेसने ४० वर्षाचा हिशोब द्यावा
काँग्रेसने भाजपाला मागच्या दहा वर्षाचा हिशोब मागितला.त्यांनी चाळीस वर्षात काय केले हे सांगितले नाही.एकेकाळी सुशील कुमारांकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद होते.देशाचे केंद्रीय मंत्रीपद होते.ही सर्व पदे असताना त्यांनी जिल्ह्याचा काय विकास केला हे आधी त्यांनी जनतेला सांगावे आणि मत मागावीत, असा सल्ला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शिंदे यांना दिला.