रांची : वृत्तसंस्था
झारखंडमधील लोकसभा निवडणुकीपूर्वी ईडीने राज्यातील काँग्रेसचे मंत्री आलमगीर आलम यांच्या सचिवाशी कथितरीत्या संबंधित नोकराच्या घरावर छापेमारी करत तब्बल ३० कोटींहून अधिकची रोकड जप्त केली. घरात आढळलेले नोटांचे बंड्डुल पाहून काही वेळ अधिकाऱ्यांचे डोळे चक्रावले. भाजपने या मुद्यावरून काँग्रेसच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ओडिशातील एका प्रचार सभेत या कारवाईचा उल्लेख करत विरोधकांना लक्ष्य केले.
झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांचा घरगुती नोकर जहांगीरच्या घरातून ईडीने घबाड जप्त केले आहे. नोटा मोजण्याच्या सहा मशीनद्वारे रात्री उशिरापर्यंत मोजदाद सुरू होती. सुमारे १२ तासांत तब्बल ३० कोटींहून अधिकची रोकड अधिकाऱ्यांनी मोजली. नोटा मोजताना काही मशीन खराब झाल्याने नव्या मशीन आणाव्या लागल्या. कारवाईचे व्हिडीओ आणि छायाचित्रात एका खोलीत मोठ्या प्रमाणात पाचशेच्या नोटांचे बंडल पडल्याचे दिसून येत आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने झारखंडच्या ग्रामीण विकास विभागाचे माजी मुख्य अभियंता वीरेंद्र रामशी संबंधित अर्धा डझन ठिकाणांवर छापेमारी करत या रोख रकमेचा खुलासा केला. रामला गतवर्षी सरकारी योजनामधील अनियमिततेशी संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. निवडणुकीपूर्वी झालेल्या या जप्तीनंतर राजकारण तापले असून भाजपने या मुद्यावरून काँग्रेस मंत्र्याला घेरत भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मोदीनी देखील ओडिशातील एका प्रचारसभेत या कारवाईचा उल्लेख करत विरोधकांवर हल्लाबोल केला.
आज शेजारी राज्य झारखंडमध्ये नोटांचा ढिगारा सापडला आहे. आता मला सांगा की, मी जर विरोधकांची चोरी, कमाई आणि लूट बंद केली तर ते मला शिव्या देणार नाहीत का ? शिव्या मिळत असल्या तरी जनतेचा पैसा मी वाचवू नये का, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर टीका केली. दुसरीकडे, आलमगीर आलम यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही निष्कर्षांवर पोहोचणे घाईचे ठरेल, असे म्हटले. संजीव लाल यांनी आपल्यापूर्वी दोन माजी मंत्र्यांचे सचिव म्हणून काम केले आहे.