नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातून लोकसभा निवडणूक हळूहळू निसटत असून, देशातील तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ते आता कोणतेही नाटक करण्याचा प्रयत्न करतील, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराने तरुणांनी विचलित होऊ नये. येत्या ४ जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल व १५ ऑगस्टच्या अगोदर तरुणांना ३० लाख नोकऱ्या देण्याचे काम हाती घेतले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
काँग्रेसचे माजी नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ संदेश जारी केला. यात ते म्हणतात की, लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातून निसटत आहे. तेसुद्धा घसरत आहेत. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. येत्या चार-पाच दिवसांत तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे आणि कसले तरी नाटक करण्याचे मोदींनी ठरवले आहे. पण, तुम्ही तुमचे लक्ष दुसरीकडे वळवू नका, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. देशातील तरुणांनो, ४ जून रोजी देशात काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. तेव्हा आम्ही तरुणांना ३० लाख नोकऱ्या देण्याचे पाऊल उचलणार आहोत.
१५ ऑगस्ट पूर्वी रिक्त सरकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. त्यांचे काहीही ऐकू नका. ‘इंडिया’चे ऐका, द्वेष सोडा, नोकऱ्या निवडा, असेही राहुल गांधी यांनी हिंदी भाषेतील व्हिडीओत म्हटले आहे. बेरोजगारी ही सध्या देशातील सर्वात मोठी समस्या आहे. मोदींनी दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले. पण, प्रत्यक्षात हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. मोदी खोटे बोलले. त्यांनी नोटबंदी केली. चुकीची जीएसटी लावली. उद्योगपती अदानींना त्यांनी मदत केली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आम्ही ‘भारती भरोसा’ योजना आणत आहोत. त्यानुसार, १५ ऑगस्टपर्यंत ३० लाख तरुणांना नोकऱ्या दिल्या जातील, असे गांधी यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.