छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
आमच्या आणि तुमच्या हिंदुत्वात खूप मोठा फरक असून आमचं हिंदुत्व चूल, तर भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं आहे, अशी टीका शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केली. महाविकास आघाडीच्या शुक्रवारी येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जिल्ह्यात पहिली सभा पार पडली. या सभेत बोलताना ते म्हणाले, राज्यात शेतकरी मेटाकुटीला आला असून सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीही देणेघेणे राहिले नाही. गुजरातची कांदाबंदी उठवली जाते, मात्र महाराष्ट्रातील कांद्यावरची बंदी का उठवली जात नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, मोदी म्हणतात की, विरोधक मला संपवायला निघाले आहेत. परंतु मोदींनी माझा शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी संपवली. मग आता यांना एवढी भीती कशाची वाटते? असाही प्रश्न त्यांनी जाहीर सभेतून विचारला. मोदींचे इंजिनच बदलायचे आहे. त्यांना पुन्हा गुजरातला पाठवून द्या. दहा वर्ष हे इंजिन केवळ वाफा नाही, तर थापा मारत असल्याचा घणाघात त्यांनी केला.
भाजप आमच्यावर टीका करते की, तुमच्याकडे किती चेहरे आहेत. सगळे आता पदाचे दावेदार असल्याचे सांगत आहेत. मात्र भाजपला एकच चेहरा जड झाला आहे. त्यामुळे त्यांनी आता नवीन चेहरा कोण ते शोधावे ? तसे पाहिले तर त्यांच्याकडे नवीन चेहराही नाही, त्यांना आता घरी बसायची वेळ आली आहे. जो व्यक्ती काहीही बोलतोय त्या व्यक्तीच्या हातात पुन्हा आपल्याला देश द्यायचा आहे का? याचा विचार जनतेला करायचा असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
पक्षफुटीवर भाष्य करताना ते म्हणाले, गद्दारी विकत घेता येते, पण निष्ठा ही रक्तात असते आणि आमच्या रक्तात हीच निष्ठा आहे. बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान आम्ही पाळायचे, हेच त्या भाजपवाल्यांना पटत नाही. त्यासाठीच आपला हा लढा आहे आणि त्यासाठीच ही आई जगदंबेची मशाल आमच्या हातात दिली आहे. ते घर पेटवणारं हिंदुत्व शिकवत आहेत, तर आम्ही चूल पेटवणारे हिंदुत्व सांगत आहोत, त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या हिंदुत्वात खूप मोठा फरक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.