नाशिक : वृत्तसंस्था
इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील भूषण दिनकर लहामगे या पहिलवानाची अज्ञात मारेकऱ्यांनी शुक्रवारी भरदुपारी मुंबई-आग्रा महामार्गावर कोयत्याने वार केल्यानंतर गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलीस मारेकऱ्यांचा कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भूषण हा रोजच्या प्रमाणे जनावरांसाठी खाद्य घेऊन नाशिककडून वाडीव-हेकडे येत असताना मुंबई-आग्रा महामार्गावरील राजूर बहुला शिवारात ही घटना घडली. त्याचा पाठलाग करणाऱ्या मारेकऱ्यांनी महामार्गावरील सरबजीत ढाब्याजवळ त्यास गाठले. त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यातून जीव वाचवण्यासाठी भूषण याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर बेछूट गोळ्या झाडल्या. तीन गोळ्या लागल्यानंतर भूषण कोसळल्याने हल्लेखोरांनी तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला. भूषणची हत्या ही पूर्ववैमनस्यातूनच झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या हत्येमागील मूळ कारण तपासून गुन्हेगारांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
राजूर बहुला शिवारात गोळीबार करून तरुणाची हत्या झाल्याची माहिती मिळताच वाडीव-हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहे. वाडीव-हेच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक सुनील बि-हाडे, पोलीस नाईक प्रवीण काकड, धोंडगे, कचरे आदींचे पथक तपास करीत आहे. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याआधारे मारेकऱ्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.