अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
जेऊर येथील श्री काशिलिंग देवस्थान ट्रस्ट व श्री काशिलिंग बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात १९ जोडपी विवाहबद्ध झाले.यावेळी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम म्हणून अयोध्या येथील रामललांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठानेच्यावेळी पौरोहित्य म्हणून प्रमुख भूमिका बजावलेले व जेऊर तालुका अक्कलकोटचे मूळ रहिवासी तथा वाराणसीचे पंडित दिक्षित कुटुंबीय तसेच ७५ वर्षावरील ३० शेतकरी बांधवाचा सन्मान करण्यात आला.
यावेळी काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी , श्री शिवानंद शिवयोगी महास्वामी, श्री नीलकंठ शिवाचार्य महास्वामी, श्री श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, श्री राजशेखर शिवाचार्य महास्वामी, श्री अभिनव बसवलिंग महास्वामी, श्री शिवशंकर शिवाचार्य महास्वामी, श्री चन्नमत महास्वामी, श्री शांतलिंग शिवाचार्य महास्वामी, महानंदाताई हिरेमठ, अब्दुल रौफ सरदार पाशा पिरजादे बाबा,सद्गुरू पांडुरंग महाराज आदी मठाधीशांसह आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे,सिद्धार्थ गायकवाड,अशपाक बळोरगी,गुरुशांत पाटील, सिद्धाराम भंडारकवठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.श्री काशीलिंग देवस्थान ट्रस्ट व बहुऊद्देशिय संस्थेच्यावतीने यंदा जेऊरला कोरोनाकाळ वगळता सलग नवव्या वर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजीत केला होता .या संस्थेत एकूण दोनशे मित्रपरिवार सदस्य एकत्र येऊन तन,मन धनाने योगदान देत आहेत.काशीलिंग बहुउद्देशीय संस्थेच्या मल्लिकार्जुन पाटील व मित्रपरिवारांकडून ८ वर्षात १५६ जोडपी विवाहबद्ध झाली.
यावेळी गावातील मुख्य रस्त्यावरून वधू वरांची मिरवणूक काढण्यात आली.या विवाह सोहळ्याचे नियोजन काशीलिंग देवस्थान ट्रस्ट व काशिलिंग बहुउद्देशीय संस्था तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी जेऊर यांनी केले होते.तत्पूर्वी वाराणसी येथील राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केलेले पुरोहित तथा जेऊरचे रहिवासी सुनील लक्ष्मीकांत दीक्षित तसेच अरुण लक्ष्मीकांत दीक्षित हे दोघे बंधू सपत्नीक उपस्थित होते.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन पाटील यांनी प्रस्ताविक करून विवाह सोहळा संयोजन उद्देश स्पष्ट केले.अक्षतासोहळ्यापूर्वी जगद्गुरू डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचे आशीर्वचन झाले. यावेळी महेश म्हेत्री आणि त्यांच्या पथकाचे सुमधुर गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
पहिली मुलगी झाल्यास दहा हजाराची ठेव
या विवाह सोहळ्यात ज्या १९ जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या.त्यातील ज्या जोडप्यांना पहिली मुलगी होईल.त्या मुलीच्या नावे दहा हजार रुपयाची ठेव बँकेत ठेवली जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.