मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी देखील लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे, शरद पवार यांना सहानुभूती असल्याचे विधान केले होते. त्यानंतर आता रासपचे नेते तथा महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांनी देखील ठाकरे व पवारांविषयी आपल्या भावना उघडपणे मांडल्या. परंतु महायुतीलाच विजय मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मी राज्यात अनेक ठिकाणी गेलो, सुमारे 52 पेक्षा अधिक सभा घेतल्या. यावेळी मला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल सहानुभूती दिसून आली. मात्र, तरीसुद्धा महायुतीच्या 42 जागा निवडून येतील, असा दावा रासपचे महादेव जानकर यांनी व्यक्त केला. तर बारामतीत सुनेत्रा पवार, बीडमध्ये पंकजा मुंडेही आणि परभणीमध्ये मी निवडून येणार, ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. असेही ते म्हणाले.
परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी बुधवारी दि.22 रोजी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. परभणीमधील पोखरणीमध्ये मनोज जरांगे आले असता याच ठिकाणी भेट घेत संजय जाधव यांनी सत्कार केला. निवडणुकीनंतर मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आपल्याला फायदा झाला असल्याचं संजय जाधव यांनी कबूल केलं होतं. तसेच आपण त्यांना भेटणार असल्याचेही सांगितलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी आज ही भेट घेतली आहे.