सोलापूर : वृत्तसंस्था
माढा लोकसभा मतदार संघातील जनतेने मला निवडणुकीसाठी उभा केले आणि त्यांनीच मला मोठ्या मताधिक्याने निवडूनही आणले. मोहिते पाटील परिवारासह माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, शुभचिंतक, मित्रमंडळीसह माझ्या मागे अदृश्य शक्तीचा हात असल्यानेच मार्ग सुकर झाला असे मत माढा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचीत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
बहुचर्चीत असलेल्या माढा लोकसभा मतदार संघामध्ये विक्रमी मताधिक्याने विजयश्री खेचून आणलेले नवनिर्वाचित संसद सदस्य व नागरिकांचा आपला माणूस धैर्यशील मोहिते-पाटील यांचे सोलापूरातुन रात्री उशीरा अकलूजनगरीत आगमन होताच अकलूजकरांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत फुलपाकळ्या व गुलालांची उधळण करुन जल्लोषात जंगी स्वागत केले.
मंगळवारी सायंकाळी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाविकास आघाडीचे माढा लोकसभेचे विजयी उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सोलापूरातून अकलजकडे प्रस्थान केले. मोहोळ, मोडनिंब, टेंभुर्णी येथील नागरीक व कार्यकत्यांनी उत्साहात स्वागत करुन सन्मान केला. रात्री १०:३० वा. अकलूज नगरीत प्रवेश करताच वरुणराजाची कृपेसह कर्मवीर चौक, प्रतापसिंह चौक, सदुभाऊ चौकात स्वागताच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांनी तोफांची सलामी देत स्वागत केले. त्यानंतर उघड्या जीप मधून खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अकलूज ते शंकरनगर रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या नागरिकांच्या शुभेच्छा स्विकारल्या. पुढे विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे जेसीबी मालक संघटेनेने २५ जेसीबीतून ३ टन फुलांचा तर २ टन गुलालाची मुक्तपणे उधळण करुन शुभेच्छा दिल्या.
शंकरनगर येथील शिवरत्न बंगल्यावर पोहोचताच धैर्यशील यांनी शिवरत्न बंगल्यातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या समाधीचे दर्शन करुन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांच्यासह मोहिते- पाटील कुटुंबातील जेष्ठांचा आशिर्वाद घेतला.