मुंबई : वृत्तसंस्था
देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच लागले असून यात कॉंग्रेसला राज्यात मोठ यश देखील मिळाले आहे. आता काँग्रेसने विधानसभेची तयारी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभेत काँग्रेस पक्ष 150 जागा लढवणार असे ते म्हणालेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे सहाजिकच काँग्रेसचे वजन वाढले आहे. त्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेसकडून जास्त जागांचा दावा केला जाऊ शकतो असे बोलले जात आहे.
नाना पटोले यांनी पुढे म्हंटले आहे की, ”लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारी करावी लागेल. आगामी विधानसभेत काँग्रेस पक्ष 150 जागा लढवण्याच्या विचारात आहे. लोकसभेत जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी साडे तीन महिने गेले. विधानसभेत हे टाळावे लागेल. त्यासाठी महिन्याभरात जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करावा लागेल. म्हणूनच आत्तापासूनच तयारी करावी लागेल”, असे नाना पटोले म्हणाले.
विशाल पाटीलही आमच्यासोबत येतील तसेच सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटीलही आमच्यासोबत येतील असा मोठा दावाही त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा मोठा फायदा झाला. या यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनाही बळ मिळाले. आम्ही हाच उत्साह घेऊन विधानसभेच्या मैदानात उतरू”, असे नाना पटोले म्हणाले.
तसेच यंदाच्या निवडणुकीत वंचितचा प्रभाव नव्हता असेही नाना पटोले म्हणाले. शिवाय मराठा आरक्षणाचा परिणामही निवडणुकीवर झाल्याची चर्चा आहे. यावरही त्यांनी भाष्य केले आहे. ”लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षण तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव नव्हता. तसेच वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचाही फारसा प्रभाव जाणवला नाही. गेल्या निवडणुकीत आम्ही वंचितमुळे ९ जागा हरलो होतो. मात्र या निवडणुकीत त्याचा कोणताही परिणाम झाला नाही”, असे नाना पटोले म्हणाले.