नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मोदी यांनी काल पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आज नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली. मोदी ३.० सरकारचा पहिला निर्णय देशातील करोडो शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी केला.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी काल सायंकाळी राष्ट्रपती भवनात पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र माेदी हे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. एनडीए आणि भाजपाचे संसदीय नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड झाली होती. त्यानंतर रविवारी शपथविधी सोहळा पार पडला. बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि सेशेल्स यांसारख्या शेजारील देशाचे प्रमख यांच्यासह विविध क्षेत्रातील तब्बल 8,000 पाहुणे शपथविधीला उपस्थित होते.
पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पहिला मोठा निर्णय घेतला आहे. पीएम किसान निधीच्या १७ व्या हप्त्याचे प्रकाशन अधिकृत करणाऱ्या फाइलवर त्यांनी स्वाक्षरी केली. याचा ९.३ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असून २० हजार कोटी रुपयांचे वितरण होईल. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत. कृषी क्षेत्रासाठी अधिक काम करत राहू. यापूर्वी, पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, १६ व्या हप्त्याचे पैसे २८ फेब्रुवारी रोजी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले गेले होते. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. तथापि, पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत, ही रक्कम एकरकमी नाही तर २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते.