सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील ओढ्यात तिथे वाहून गेले होते. त्यापैकी दोघांनी पोहत येऊन किनारा गाठला असला तरी एकजण अद्यापही बेपत्ता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम सुरू असून तब्बल १५ तास ओलांडले तरीही वाहून गेलेल्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. दरम्यान, पुलांची उंची कमी असल्याने सातत्याने अशा घटना घडत आहेत. तसेच संबंधित ठेकेदार आणि प्रशासनच याला जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सोलापूर शहर व परिसरात गेल्या चार ते पाच दिवसापासून सातत्याने पाऊस पडत आहे. अनेक भागात जोरदार पाऊस पडल्यामुळे ओढे, नदी, नाल्यांना महापूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे गावच्या शेजारीच असलेल्या ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवरुन पूल ओलांडत असलेले तिघे जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावे असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचविण्यात यश मिळविले आहे.
तर ज्ञानेश्वर कदम यांचा पत्ता अद्यापही लागलेला नाही. घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावचे सरपंच यशपाल वाडकर, ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले, पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार जाधव यांच्यासह एनडीआरएफच्या जवानांना बोलावण्यात आले होते. तर बुधवारी दिवसभर तहसीलदार किरण जमदाडे यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर कदम यांची शोध मोहीम सुरू होती. रात्री उशिरापर्यंत त्यांचा पत्ता लागला नाही.