पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील बारामती लोकसभा मतदार संघ यंदा मोठ्या चर्चेत आला होता. कारण याच मतदार संघातून शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे व अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लढत झाली होती. मात्र या निवडणुकीत नंतर आता राज्यसभेच्या रिक्त असलेल्या जागेवर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार मागील दरवाजाने संसदेत पोहोचल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अभिनंदन करतानाच काका अजित पवार यांना खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे.
रोहित पवार म्हणाले की, मुलगा किंवा बायको सोडून जाणार नाही याची खात्री दादांना असल्याने त्यांनी घरात उमेदवारी दिली आहे. माझ्या काकी म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो, आता त्या खासदार झाल्या आहेत. दरम्यान ते पुढे म्हणाले की, अजित पवारांनी अगोदरच सांगितले होते की, आम्हाला राज्यमंत्रीपद शोभणारे नाही. त्यामुळे काकींना राज्यमंत्रीपद दिलं गेल्यास अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावे लागेल, असा टोला देखील त्यांनी लगावला.
रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, त्यांच्या पक्षामध्ये काय सुरू आहे याची माहिती अजित पवारांना आहे. त्यामुळेच त्यांनी काकींना खासदारकी दिल्याचा माझा दावा आहे. त्यामुळे आईला उमेदवारी मिळाली असेल, तर अर्थातच मुलगा पार्थ खुश असेल. मी तुमच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार माध्यमांशी बोलताना त्यांना पाठिमागून सूचना दिल्या जात होत्या. त्यावर रोहित पवार म्हणाले की, त्यांना काही गोष्टी माहित नसतील म्हणून कोणी काही सांगितले तर त्यात काही वावगं नाही.