ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यातील चित्र पेरणीनंतर पाऊसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर

शेतकऱ्यांसह खतविक्रेते झाले हवालदिल

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मोठी तयारी केली आहे.पहिल्याच टप्प्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती.त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी ६० टक्के पेरण्या पूर्ण केल्या.अचानक पेरणीनंतर पाऊस गायब झाल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर मात्र मोठे संकट निर्माण झाले आहे.

उर्वरित ४० टक्के शेतकऱ्यांच्या अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत. बी – बियाणे खरेदी करून ठेवलेले आहेत पण पाऊसच नसल्याने पेरणी कशी करायची अशी चिंता त्यांच्या समोर निर्माण झाली आहे.तर जे शेतकरी पेरणी केलेले आहेत त्यांनी हजारो रुपये बी – बियाणासाठी खर्च केले आहेत त्यांच्यापुढे पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. त्याशिवाय जे खत विक्रेते, कृषी केंद्र आहेत त्यांनी तूर, मूग उडीद,सोयाबीन यासारख्या बियाणावरती लाखो रुपयांची गुंतवणूक करून दुकानांमध्ये माल भरून ठेवला आहे परंतु पावसाने अशी दडी मारल्याने त्या ठिकाणचे व्यवहार देखील ठप्प झाले आहेत.

त्यामुळे कृषी केंद्र चालकही संकटात सापडले आहेत. यावर बोलताना तालुका खतविक्रेते संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील म्हणाले, सुरुवातीला शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात यावर्षी पाऊस पडेल म्हणून बी – बियाणे खरेदी केले परंतु नंतर मात्र पाऊस नसल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. जर येत्या आठ दिवसात पाऊस नाही पडला तर मात्र दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय नाही. तालुक्यात मोठा पाऊस पडेल आणि यावर्षी खरीप हंगाम हाताला लागेल या आशेवर तुर ,मूग, सोयाबीन, उडीद यासारखे पिकांची पेरणी केली परंतु आता जमिनीत पुरेशी ओल नसल्याने हे पिके करपून जात आहेत. प्रशासनाने खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना जाहीर केलेली आहे ही योजना जरी जाहीर केलेली असली तरी त्या आधीच पिके करपून गेले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्याची नुकसान भरपाई कोण देणार हा देखील खरा प्रश्न आहे. मागच्या दोन-तीन वर्षाचा अभ्यास जर केला तर मृग नक्षत्र किंवा त्या पुढच्या नक्षत्रामध्ये कधी पेरणी झाली नव्हती.परंतु यावर्षी पावसाळा वेळेवर सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने घाई गडबडीत पेरण्या केलेले आहेत.त्यानंतर मात्र गेल्या आठ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.याबाबत कृषी विभागाकडे विचारणा केली असता ते म्हणाले की,याआधीच आम्ही शेतकऱ्यांना पेरणी योग्य पाऊस आणि पुरेशी ओल असली तरच पेरणी करावे,असे आवाहन केले होते परंतु काही शेतकऱ्यांनी घाई गडबड केलेली आहे त्यामुळे आता या पिकांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.यात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे. सरकारने या सर्व परिस्थितीची माहिती कृषी विभागाकडे घेऊन खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना विशेष पॅकेजच्या स्वरूपात मदत करावी,अशी मागणी चुंगीचे शेतकरी तुकाराम दुपारगुडे यांनी केली आहे.

शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत

पावसावर अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचा अर्थकारण अवलंबून आहे.कुरनूर धरणातील सध्या केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे.धरण भरल्याशिवाय तालुक्यात उलाढाल होऊ शकत नाही. त्यामुळे अक्कलकोट शहर व तालुक्यातील शेतकरी सध्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!