मुंबई : वृत्तसंस्था
एचडीएफस बँक या हेवीवेट शेअर्समधील तेजीच्या जोरावर बुधवारी (दि.३) भारतीय शेअर बाजाराने सर्वकालीन उच्चांक नोंदवला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५७० अंकांनी वाढून पहिल्यांदाच ८० हजारांच्या अंकाला स्पर्श केला. तर निफ्टीने २४,३०० चा विक्रमी उच्चांक गाठला.
सेन्सेक्स आज सकाळी ८०,०१३ वर खुला झाला. त्यानंतर त्याने ८०,०७४ च्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला. सेन्सेक्सवर एचडीएफसी बँकेचा शेअर्स ३ टक्क्यांनी वाढून १,७९१ रुपयांवर पोहोचला. त्याचबरोबर ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक हे शेअर्सही हिरव्या रंगात व्यवहार करत आहे.
बँकिंग शेअर्स तेजीत
निफ्टीने सुरुवातीच्या व्यवहारात २४,३०७ अंकांवर झेप घेतली. त्यानंतर तो २४,२७० वर आला. निफ्टीवर एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, टाटा कन्झ्यूमर, ब्रिटानिया, बजाज ऑटो हे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत. तर टीसीएस, रिलायन्स, टाटा मोटर्स या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.